ब्रेकिंग न्यूज : दहा हजाराची लाच घेणाऱ्या पोलीस पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात तक्रारदार व्यक्तीचे वाहन निंभोरा पोलीस स्टेशन येथे जप्त झाले होते. निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांनी वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराला १५ हजारांची लाच मागितली. अखेर तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्याला रंगी हात पकडले आहे ही कारवाई जळगाव एसीबीने केली आहे.

कैलास ठाकूर (वय ४०, रा. निंभोरा ता. रावेर) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते निंभोरा पोलीस स्टेशनला नियुक्त होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. त्यातील वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला वाहन देण्याबाबत आदेशित केले होते.

मात्र निंभोरा पोलीस स्टेशनचे पीएसआय कैलास ठाकूर यांनी हे वाहन सोडविण्यासाठी १५ हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगावला संपर्क करून तक्रार दिली. त्यानंतर सापळा रचण्यात आला. निंभोरा गावात मरीमाता मंदिराजवळ पीएसआय ठाकूर यांना तक्रारदार यांच्याकडून १० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली.

सदर कारवाई हि पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, निरीक्षक अमोल वालझाडे, निरीक्षक नेत्रा जाधव, पीएसआय दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे,मपोहेकॉ शैला धनगर ,पोना.किशोर महाजन, पोना. सुनिल वानखेडे ,पोकॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पोकॉ अमोल सुर्यवंशी, पोकॉ सचिन चाटे आदींनी केली आहे. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांना लाच घेताना पकडल्याने रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Protected Content