चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चुलत दीरासोबतच्या अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा निर्घृण खून केला तर कुणाला संशय येवू नये महणून मृतदेह महामार्गावर आणून टाकल्याची खळबळजनक घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारातील महामार्गावर मंगळवारी १८ जून रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. पत्नीने आधी ब्लेडने पोटावर वार केले. त्यानंतर प्रियकर चुलत दीर याने ३० किलो वजनाचा दगड डोक्यात टाकून ठार केले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पत्नी व चुलत दीराला अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोगंरी, ता. नादंगाव, जि. नाशिक) असे या मयताचे नाव आहे. वंदना बाळू पवार व तीचा चुलत दिर गजानन राजेंद्र पवार असे अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाळू पवार हा आपल्या पत्नी वंदना पवार यांच्यासोबत नाशिक जिल्ह्यातील न्याडोंगरी येथे वास्तव्याला होता. बाळू पवार हा नेहमी दारूच्या नशेत येवून पत्नी वंदना पवार हिला मारहाण करत होता. दरम्यानच्या कालावधीत विवाहितेचे तिचा चुलत दीर गजानन राजेंद्र पवार यांच्यासोबत प्रेम संबंध जुळून आले. गजानन आणि वंदना यांच्या प्रेम संबंधात बाळू पवार हा अडसर ठरत असल्याचे बघून दोघांनी त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान मंगळवारी १८ जून रोजी गजानन याने बाळू पवार याला खूप दारू पाजली. व दुचाकीवर बसवून रात्री १०.३० वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव शिवारातील महामार्गावर येथे आणले. त्याठिकाणी पत्नी वंदना हिने पती बाळू पवार यांच्यावर ब्लेडने पोटावर वार केले. तर गजानन याने बाजूला पडलेला ३० किलो वजनाचा दगड उचलून बाळूच्या डोक्यात टाकून त्याचा निर्घृण खून केला.
त्यानंतर दोघांना पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर आणून टाकला. कुणाला संशय येऊ नये म्हणून दोघांनी मिळून त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून त्याचा दारुच्या नशेत अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव केला. त्यानंतर दोघे पसार झाले. ही घटना घडल्याचे चाळीसगाव शहर पोलीसांना माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. सुरूवातील चाळीसगाव शहर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
बाळू पवार याच्या अंगावरील खुणांमुळे हा अपघात नसून घातपात असल्याचा पोलिसांचा संशय आला. त्यानंतर पोलीसांनी मयत बाळूच्या नातेवाईकांकडे विचारपूस करण्यात आली. मयताची पत्नी वंदना हिच्याकडे फोनवरुन चौकशी केली असता तिच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. चाळीसगाव रेल्वे स्टेशन परिसरातून वंदना व तिचा चुलत दीर गजानन या दोघांना संशयास्पद अवस्थेत ताब्यात घेत चौकशी अंती अटक करण्यात आली. दोघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. चौकशी व तपासाअंती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप भटू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.