ब्रेकींग : सावखेडा शेत शिवारातून गांजाचा मोठा साठा जप्त

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशन हद्दीतील सावखेडा येथील रहिवाशी सुभाष बाबुराव पाटील यांच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाली. पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी सुभाष पाटील यांच्या शेतात धाड टाकुन सुमारे २०० गांज्याच्या झाडांची लागवड केली असल्याचे मिळून आले. तसेच घटनास्थळावरुन सुमारे ४६ लाख ४८ हजार रूपये किंमतीचा किलो गांजा जप्त करण्यात आला. तसेच आरोपी सुभाष पाटील यांचेविरुद्ध एन. डी. पी. एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुभाष पाटील यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावखेडा ता. पाचोरा येथील मुळचे रहिवाशी सुभाष बाबुराव पाटील यांची सावखेडा येथे शेत गट क्रं. ६१ / १ ही जमिन आहे. मागील १५ वर्षांपासून सुभाष पाटील हे मुंबई येथे खाजगी वाहनावर चालक म्हणुन काम करत होते. मात्र गेल्या काही वर्षांपुर्वी ते सावखेडा गावी येवुन शेती करु लागले. दरम्यान सुभाष पाटील यांना गांजा घेण्याची लत लागली. पर्यायी सुभाष पाटील यांनी सुरुवातीला त्यांचे शेतातच कमी प्रमाणात गांजाची लागवड सुरू केली. कालांतराने सुभाष पाटील यांनी गांजाची लागवड वाढवली. गेल्या वर्षी सुभाष पाटील यांना गांजा पासुन सुमारे दिड लाख रुपयांचे उत्पन्न देखील झाले होते. गेल्या दोन दिवसांपुर्वी पाचोरा येथील व्यापारी हा सुभाष पाटील यांचे शेतात येवुन २ लाख रुपयात गांजाची मागणी केली असता सुभाष पाटील यांनी गांजा देण्यास नकार दिला. दरम्यान गांजाच्या शेतीवर फवारणी करण्यासाठी असलेल्या मजुराने गांजा शेतीचा फोटो काढुन पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना पाठविला असता सुभाष पाटील व पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसात प्रकरण दडपण्यासाठी ७५ हजार रुपयांची आॅनलाईन पद्धतीने देवाण घेवाण झाल्याची परिसरात चर्चा आहे. अखेर दि. २३ नोव्हेंबर रोजी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक महेंद्र वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोलिस हवालदार रणजित पाटील, पोलिस नाईक अरुण राजपूत, शिवनारायण देशमुख, सचिन वाघ, पोलिस शिरस्तेदार संदीप राजपूत, अभिजित निकम, दिपक सोनावणे, प्रमोद वाडीले, अमोल पाटील, उज्वल जाधव, विकास पवार या पथकाने केली. दरम्यान घटनास्थळी निवासी नायब तहसिलदार संभाजी पाटील, पोलिस पाटील प्रविण परदेशी उपस्थित होते.

आर्थिक देवाण घेवाण करणारा पोलिस व व्यापारी कोण ?
सुभाष पाटील यांच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याची माहिती पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांना मिळाल्यानंतर सुभाष पाटील व पोलिसात प्रकरण दडपण्यासाठी आर्थिक व्यवहार झाला असल्याची परिसरात चर्चा आहे. तसेच सुभाष पाटील यांचेकडे पाचोरा येथील एका व्यापाऱ्याने गांजाची मागणी केली होती. या प्रकरणात आर्थिक व्यवहार करणारा तो पोलिस कोण ? तसेच पाचोरा येथील तो गांजाचा व्यापारी कोण ? याचा शोध लावण्याचे पोलिस प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

Protected Content