जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगावकडून जळगावकडे येत असलेल्या एका कारला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने कारमधील एक प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी आणि आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना पिंप्री गावाजवळ घडली. जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. या अपघातात महेश सुरेश सोनार (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांचा मृत्यू झाला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश सोनार हे रामेश्वर कॉलनीत पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते आणि पाण्याचे जार वाटपाचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आज अमळनेर येथे त्यांची मुलगी नैनाची एमबीएच-सीईटीची परीक्षा होती. त्यामुळे ते आपली मुलगी नैना आणि राजेश मिठूलाल धूत (वय ४६) यांच्यासोबत कारने अमळनेरला गेले होते. परीक्षा संपवून ते दोघे मुलीसह जळगावकडे परत येत असताना, दुपारी दीड वाजेच्या सुमारास पिंप्री गावाजवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या एका बोलेरो पिकअप वाहनाने जबर धडक दिली. या भीषण अपघातात महेश सोनार यांचा मृत्यू झाला, तर त्यांची मुलगी नैना आणि सोबत असलेले राजेश धूत गंभीररित्या जखमी झाले.
याच रस्त्यावरून खासदार स्मिताताई वाघ हे अमळनेरकडे जात असतांना त्यांना अपघात झाल्याचे दिसून आले. कारमधील सर्वजण जळगावातील रामेश्वर कॉलनीतील असल्याचे समजल्यानंतर त्यांनी त्या परिसरातील माजीनगरसेवक राजेंद्र घुगे पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार मयतांच्या नातेवाईकांना अपघात झाल्याची माहिती देण्यात आले. जखमींना जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहोचताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला, ज्यामुळे वातावरण अधिक शोकाकुल झाले होते.
दरम्यान, समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअपमध्ये भोद गावातील लग्नातील वऱ्हाड होते. यात आज हळदीचा कार्यक्रम असल्याने नववधू देखील बोलेरो वाहनात होती. या अपघातात बोलेरोमधील काही जणही जखमी झाले असून, त्यांना नजीकच्या धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.