जळगाव (लाईव्ह ट्रेंडस न्यूज): जळगाव शहरातील संजय मधुकर इंगळे यांना एका रस्ता अपघातात आपला उजवा हात गमवावा लागला होता. या अपघातातील नुकसान भरपाईपोटी त्यांना मोटार अपघात दावा प्राधिकरणाने तब्बल १२ लाख ५० हजार रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.
संजय इंगळे यांचा ३० जानेवारी २०२४ रोजी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनच्या हद्दीत अपघात झाला होता. ते काम संपवून खेडी रोडवरील गौरव हॉटेलसमोरून पायी चालले जात असताना, छत्तीसगड येथील बलकारसिंग हरदेवसिंग या ट्रक चालकाने निष्काळजीपणे आणि भरधाव वेगात ट्रक चालवत त्यांना अगदी जवळून ओव्हरटेक केले. ट्रकच्या डुकमध्ये त्यांचा उजवा हात अडकला आणि तो दंडापासून पूर्णपणे तुटला.
या गंभीर अपघातामुळे संजय इंगळे यांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचा उजवा हात दंडापासून कापावा लागला. याप्रकरणी एम. आय. डी. सी. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती आणि ट्रक चालक हरदेवसिंग याच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.
अपघातामुळे आलेले कायमस्वरूपी अपंगत्व आणि औषधोपचाराचा खर्च भरून काढण्यासाठी संजय इंगळे यांनी जळगाव येथील मोटार अपघात दावा प्राधिकरण येथे ॲड. महेंद्र सोमा चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. अपघातामुळे त्यांना १ लाख ३ हजार रुपयांचा औषधोपचाराचा खर्च आला होता आणि ८० टक्के अपंगत्व आले होते. अपघातापूर्वी ते वाहनचालक म्हणून नोकरी करत होते, परंतु हात गमावल्याने त्यांची उपजीविकेचे साधनही हिरावले गेले होते, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी न्यायालयात मांडला.
विशेष म्हणजे, संजय इंगळे यांनी कृत्रिम हात बसवण्यासाठी येणारा अंदाजित खर्च आणि त्याच्या देखभालीचा खर्चही नुकसान भरपाईमध्ये समाविष्ट करण्याची विनंती कोर्टात केली होती. या सर्व बाबींचा विचार करून, १० मे रोजी झालेल्या लोक अदालतीमध्ये न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीने चर्चेअंती १२ लाख ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली.
अशा प्रकारे, अपघातामुळे झालेले अपंगत्व, औषधोपचाराचा खर्च आणि कृत्रिम हात बसवण्याचा व त्याच्या देखभालीचा खर्च मिळून एकूण १२ लाख ५० हजार रुपयांची भरपाई संजय इंगळे यांना मिळाली. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने ॲड. महेंद्र सोमा चौधरी, ॲड. श्रेयस महेंद्र चौधरी, ॲड. हेमंत जाधव आणि ॲड. सुनील चव्हाण यांनी कामकाज पाहिले. हे प्रकरण लोक अदालतीच्या पॅनल क्रमांक १ चे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश-२ बी. एस. वावरे यांच्यासमोर निकाली काढण्यात आले.