मुंबई वृत्तसंस्था | दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्रात प्रवेश केला असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बुधवार दि.२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून डोंबिवलीमध्ये आलेल्या 33 वर्षीय तरुणामध्ये ओमायक्रॉन हा व्हेरियंट सापडल्याचे प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झाले आहे.
ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराचा देशातील चौथा आणि राज्यातील हा पहिला रुग्ण आहे. हा तरुण कल्याण डोंबिवली येथील रहिवाशी असून तरुणाने कोणतीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील 25 सहप्रवाशांची देखील तपासणी करण्यात आली असून यापैकी सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तसेच निकटवर्तींचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोरोना चाचणीत निगेटिव्ह आढळले आहेत.