जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपायास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने ३० हजाराची लाच घेताना कार्यालयातच अटक केली आहे. या कारवाईने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात खळबळ उडाली आहे.
जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सिक्युरिटी गार्डच्या नोकरीसाठी जळगाव जिल्ह्यातील एकाने अर्ज केला होता. या कार्यालयातील चौधरी नामक शिपायाने आपले कार्यालयातील वरिष्ठांशी घनिष्ट संबंध असल्याची बतावणी करत तक्रारदाराचा विश्वास संपादनकरत नोकरी लावून देण्यासाठी २ लाख १० हजारांची मागणी केली होती. पहिल्या टप्प्यात सोमवारी तीस हजार रुपये देण्याचे ठरले. यानंतर अर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवली होती. जळगाव कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचत तीस हजारांची लाच स्वीकारताना शिपायास रंगेहात अटक केली.
यांनी रचला सापळा
हा सापळा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे नाशिक पोलीस अधीक्षक सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक एन .एस.न्याहळदे पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक संजय बच्छाव व पोलीस निरीक्षक एन. एन. जाधव, एसआयएस दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक पाटील, मनोज जोशी, पोलीस नाईक जनार्दन चौधरी प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नसीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पवार आदींच्या पथकाने केला.