जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कान्ह ललित केंद्र जळगावअंतर्गत येणार्या नाट्यशास्त्र विभागातर्फे श्रीकृष्ण जयंतीनिमित्त नाट्य विभागातील विद्यार्थ्यांची आनंदवन ही एकांकिका मू.जे. महाविद्यालय जुना कॉन्फरन्स हॉल येथे उत्कृष्ट सादरीकरण करत सादर केली.

यावेळी महाविद्यालयीन शिक्षक आणि विद्यार्थ्यांची लक्षणिय गर्दी जमली होती. टाळ्यांंच्या गजरात विद्यार्थ्यांनी कलाकार विद्यार्थ्यांना भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांचा कान्ह ललित कलेचे समन्वयक मिलन भामरे यांनी सत्कार केला. यावेळी केसीई सोसायटीचे सदस्य प्रा.चारुदत्त गोखले, कला शाखा प्रमुख डॉ. बी.एन.केसूर, महाविद्यालयाचे कुलसचिव जगदीप बोरसे यांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पीयूष रावळ, डॉ. राजेंद्र देशमुख, सचिन चौघुले, योगेश शुक्ल आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे उपस्थित होत्या.
यावेळी केसीई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर यांनी सांगितले की, श्रीकृष्णामुळे नरकासूर ही प्रवृत्ती कशाप्रकारेे गतप्राण झाली आणि त्याचप्रमाणे आपली संस्कृती आणि परंपरा अशा नाटकातून कशी टिकत आहे, याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी कृष्णावर आधारित ही एकांकिका उत्कृष्ट असून असे प्रयोग प्रत्येक महाविद्यालयात झाले पाहिजे, जेणेकरून यातील विषय आजच्या विद्यार्थ्यांना कळून त्यावर त्यांनी आपले भाष्य करणे गरजेचे आहे. आज अनादी काळापासून महिलांवर अत्याचार होत आहे, जे आजही सुरूच आहे. यावर उपाययोजना करून आताच्या युगातील नरकासूरसारख्या आजच्या काळातील प्रवृत्तींनाही वचक बसला पाहिजे, असे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी के.सी.ई सोसायटी आणि मू.जे.महाविद्यालय नेहमी तत्पर असते. त्यानुषंगाने या एकांकिकेचे आयोजन करण्यात आले होते असल्याचे सांगितले. या एकांकिकेत 9 मुली असून त्या श्रीकृष्णाचा धावा करताना आढळून येतात. या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक प्रा.वैभव मावळे असून मार्गदर्शक विभागप्रमुख प्रा. हेेमंत पाटील आहेत. या एकांकिकेचे निर्माते के.सी.ई सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर आहेत. दरम्यान, लोकेश मोरे यांनी ही एकांकिका संगीतबद्ध केली असून अभिषेक कासार यांची प्रभावी अशी प्रकाश योजना होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार गोपीचंद धनगर यांनी तर यशस्वितेसाठी दिनेश माळी यांनी सहकार्य केले.
या विद्यार्थ्यांचा सहभाग
हिमानी संजय महाजन, सोनल सदाशिव शिरतुरे, गायत्री भगवान सोनवणे, कुलश्री हितेंद्र कुलकर्णी, प्रतीक्षा चंद्रकांंत कापडणे, हर्षांजली सुनील शिंपी, शेख अन्शरा मो. आजीम, ज्योती संतोष पाटील, वैशाली गोपीचंद कोळी.
असा होता विषय…
नरकासूर हा सोळा सहस्त्र स्त्रियांना बंदी करून आपल्या स्वार्थासाठी त्यांना बळी देण्यासाठी ठेवतो. यावेळी श्रीकृष्ण नरकासूराशी युद्ध करून त्या स्त्रियांची सुटका करतो. यावेळी बंदीवान स्त्रियांना कोण स्वीकारेल असा प्रश्न पुढे आल्यावर श्रीकृष्ण आपल्या विविध रुपांच्या माध्यमातून त्यांच्याशी विवाह करून त्यांना या समाजापासूनही वाचवतो. यावेळी स्त्रिया आनंदी होताना दिसतात.