मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना आमदारकीची शपथ देण्यासाठी ७, ८ आणि ९ डिसेंबर रोजी मुंबईत विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनासाठी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या आमदारांनी आमदारकीच्या शपथ कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी येथे पोलीसांनी स्थानिक गावकऱ्यांना मतपत्रिकेवर मतदान घेऊ दिले नाही. या घटनेचा विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध केला आहे.
एखादं सरकार निवडून आल्यानंतर जो उत्साह आणि जल्लोष दिसायला हवा ते दिसत नसल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे हे जनमत जनतेने दिलेले आहे की निवडणूक आयोगाने, अशी शंका मनात येते, असे ठाकरे म्हणाले. आम्ही जनतेच्या मनातले प्रश्न निवडणूक आयोगाकडे उपस्थित केले होते. मारकटवाडी येथील जनतेने मतपत्रिकेवर मतदान घेण्याची परवानगी मागितली होती. परंतु पोलिसांनी दडपशाही करून ते होऊ दिलं नाही. गावात संचारबंदी लावून स्थानिकांना अटक करण्यात आली. विरोधी पक्षातले जे आमदार जिंकून आले आहेत, त्यांच्याही मनात ईव्हिएम आणि निवडणूक आयोगाबद्दल शंका आहेत. २०१४ पासून लोकशाही चिरडण्याचं काम सुरू आहे. या सर्वांचा निषेध म्हणून आमदारकीची शपथ घेत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.