
सोलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी मारकडवाडी गावात मतदानाच्या आकडेवारीत घोळ असल्याचे सांगून तिथे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निवडणूक आयोगाने यासाठी परवानगी दिली नाही, तसेच पोलीस प्रशासनाने हस्तक्षेप करत गावकऱ्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर मारकडवाडी गाव हे देशभरात चर्चेत आले.


त्यातच लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मारकडवाडीतून बॅलेट यात्रा सुरू करणार असल्याचीही चर्चा समोर आली. आता माळशिरसचे नवनियुक्त आमदार उत्तमराव जानकर यांनी आपली आमदारकी सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून ९ डिसेंबर पर्यंत विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. यासाठी सर्व आमदार मुंबईत आले असून २८८ आमदारांचे शपथविधी पार पडणार आहेत. आज पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथविधीवर बहिष्कार टाकला.


