तेलंगणातही ‘खोके पॅटर्न’ ? : आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न

हैदराबाद-वृत्तसंस्था | एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची देवाण-घेवाण चर्चेचा विषय बनली असतांना तेलंगणातही हाच प्रकार सुरू असल्याचे संकेत मिळाले असून आमीष दाखविणार्‍या तिघांना अटक करण्यात आली आहे.

 

तेलंगणात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पक्षांतर करावं यासाठी मध्यस्थी करणार्‍या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी फार्महाऊसवर धाड टाकून ही कारवाई केली आहे. तेलंगण राष्ट्र समितीच्या चार आमदारांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न होता. मात्र त्यांनीच पोलिसांनी यासंदर्भात माहिती दिली आणि यानंतर ही कारवाई करण्यात आली. यावेळी महत्त्वाच्या व्यक्तीला १०० कोटी आणि प्रत्येक आमदाराला ५० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अलीकडेच एका भाजपा नेत्याने तेलंगण राष्ट्र समितीचे १८ आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केला होता. यातच ही घटना घडल्याने तेलंगणा राष्ट्रीय समितीने भाजपवर टीका केली आहे. अजीज नगर येथील फार्महाऊसमध्ये काल संध्याकाळी कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आमदारांनी पोलिसांना फोन करुन आपल्याला पक्षांतरासाठी प्रलोभनं दिली जात असल्याची तक्रार केली होती.

दरम्यान, भाजपाने सर्व आरोप फेटाळले असून मुख्यमंत्री लक्ष विचलित करण्यासाठी घोडेबाजार झाल्याचा आरोप करत असल्याचं म्हटलं आहे.

 

Protected Content