जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलांना पाहून शिट्या का वाजतात असा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्याच्या भावाला चौघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत दगडफेक करून दुखापत केल्याची घटना नशिराबाद बसस्थानकाजवळ घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फजलखान फरीद खान (वय-१८) रा. अली मोहल्ला, नशिराबाद ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पेंटरकाम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी १४ जून रोजी दुपारी फजलखान हा त्याचा चुलतभाऊ दानिश खान रईस खान याच्यासोबत घरी पायी जात असतांना बसस्थानकाजवळ रूपेश माळी, वासू माळी, विनोद माळी, गणेश माळी सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव हे महिलांकडे पाहून शिट्या मारत होते. त्यावर महिलांना पाहून शिट्या का मारतात असा जाब फजलखान याने विचारला. याचा राग असल्याने चौघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली त्यानंतर दगडफेक केली. यात फजल खानचा चुलत भाऊ दानिश खान याचे डोके फोडले व दोघांन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी झालेल्या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी रात्री साडे नऊ वाजता फजल खान याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रूपेश माळी, वासू माळी, विनोद माळी, गणेश माळी सर्व रा. नशिराबाद ता.जि.जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.