महापालिकेत अनुकंपा तत्वावर दोघांना मिळाली नोकरी; उपमहापौरांचा पाठपुरावा

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेतील मयत झालेल्या दोन सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना आज नियुक्तीपत्रे देण्यात आले. उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या प्रयत्नांनी त्यांना महापालिकेत नोकरीत सामावून घेण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव शहर महापालिकेत आज सफाई कामगारांच्या २ वारसांना पालकांच्या जागी नियुक्तीची पत्रे देण्यात आली. लाड  समितीने राज्य सरकारला केलेल्या  शिफारशीनुसार राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये अशा नियुक्त्या केल्या जातात. राज्य सरकारच्या अनुकंपा तत्वावर नियुक्ती सारखेच हे राज्य सरकारचे सफाई कामगारांसाठीचे स्वतंत्र धोरण आहे . त्यानुसार या दोघांनाही सफाई कामगार म्हणूनच नियुक्ती देण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. आज या दोघांना नियुक्तीपत्र देतांना उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक चेतन सनकत,  किशोर बाविस्कर,  एमआयएमचे रियाझ बागवान आणि कुंदन काळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, या दोन्ही सफाई कर्मचार्‍यांना नियुक्ती मिळण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाठपुरावा केला. या संदर्भात उपमहापौर म्हणाले की, महापालिकेत अनेक मयत कर्मचार्‍यांचे वारस हे सेवेत सामावून घेण्याच्या प्रतिक्षेत आहेत. या संदर्भात आपण राज्य शासनाने वेळोवेळी घेतलेले निर्णय व निर्देश तसेच उपलब्ध आकृतीबंधाचे अध्ययन करून जास्तीत जास्त वारसांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी माहिती उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

Protected Content