राष्ट्रवादीचे दोन्ही गट पात्र; नार्वेकरांनी दिला निकाल

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट आणि शरद पवार गट या दोन्ही गटाकडून दाखल करण्यात आलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकांवरील निकाल जाहीर केला. मागील बऱ्याच दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर या प्रकारणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान अखेर आज या प्रकरणी निकाल जाहीर करताना राहुल नार्वेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल दिला. तसेच आमदार अपात्रता प्रकरणात नार्वेकरांनी अजित पवार गटातील आमदारांविरोधात शरद पवार गटाने केलेली अपात्रतेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे अजित पवार गटातील ४१ आमदार हे पात्र ठरले आहेत.यावेळी शरद पवार गटाच्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत, तर अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र ठरल्याने हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गटाच्या देखील याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील आमदार देखील पात्र ठरले आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देखील काही दिवसांपूर्वी देण्यात आलेल्या शिवसेना आमदार अपात्रता निकालाप्रमाणेच लागला आहे. दरम्यान निकालाच्या सुनावणीदरम्यान नार्वेकर म्हणाले की, नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. तसेच अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणाही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही असेही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. पक्षातील मतभेद म्हणजे कायद्याचा भंग नाही असेही नार्वेकर यावेळी म्हणाले.

Protected Content