जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नेहमीप्रमाणे सायंकाळी फिरण्यासाठी निघालेले प्रकाश इंद्रलाल आहुजा (वय ५१, रा. गणपतीनगर) हे रात्रभर घरी परतले नाही. त्यांच्या कुटुंबियांनी रात्रभर शोध घेतल्यानंतर त्यांचा बुधवारी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता मेहरुण तलावात मृतदेह आढळून आला. त्यांच्या मुलाने वडीलांची ओळख पटविल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणपती नगरात प्रकाश इंद्रलाल आहुजा हे प्रौढ कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांच्या मुलाचे मोबाईलचे दुकान असून त्यावर त्यांच्या कुटुंबियांच्या उदनिर्वाह करतात. मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास प्रकाश आहुजा हे नेहमीप्रमाणे बाहेर फिरण्यासाठी निघाले. मात्र रात्र उशिरापर्यंत ते घरी न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रात्रभर शोध घेवून देखील आहुजा हे मिळून आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा हा काकांना घेवून पोलिसात तक्रार देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक मंधाण यांच्याकडे गेले होते.
मंधाण यांनी आहुज यांच्या मुलाला मेहरुण तलावात बुडालेल्या इसमाचे फोटो दाखविले. मोबाईलमधील फोटो बघताच आहुजा यांच्या मुलाने आक्रोश करीत ते आपले वडील असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर मंधान हे त्यांना घेवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आले. याठिकाणी देखील त्यांनी मृतदेह बघितल्यानंतर वडीलांची ओळख पटवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.