
बोदवड,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बोदवड शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाईसंदर्भात उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी दिलेल्या आदेशाकडे नगरपंचायतीने दुर्लक्ष केल्याचे गंभीर प्रकरण उघड झाले आहे. चार महिन्यांपूर्वीच ४५५ अवैध दुकाने जमीनदोस्त करण्याचा आदेश देण्यात आला असतानाही त्याची अंमलबजावणी आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून या प्रकरणाने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
यशपाल बडगुजर यांनी बोदवड शहरातील नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्या अवैध दुकानांविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर कारवाई करत उपविभागीय अधिकारी भुसावळ यांनी बोदवड नगरपंचायत व तहसीलदार बोदवड यांना शहरातील अतिक्रमण, अवैध अस्थापना आणि नाल्यावरील बांधकामे तातडीने हटविण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेश निर्गमित होऊन चार महिने उलटूनही नगरपंचायतीने कोणतीही ठोस कारवाई केलेली नसल्याचे समोर आले आहे.
या निष्क्रियतेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे मलकापूर शहरप्रमुख हरिदास गणबास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर नगरपंचायतीने त्वरित कारवाई केली नाही, तर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तसेच राष्ट्रीय हरित लवाद (NGT) येथे दाखल करण्यात येईल. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी जळगाव, तहसीलदार बोदवड, मुख्याधिकारी नगरपंचायत बोदवड, महसूल विभाग मुंबई मंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या निवेदनानंतर अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काहींनी तक्रारदार यशपाल बडगुजर यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बडगुजर यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, शहरातील रस्ते अतिक्रमणामुळे अरुंद झाले असून वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत. नागरिकांना चालणेही अवघड झाले आहे. पर्यावरण आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनेच त्यांनी ही तक्रार दाखल केली असून प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी तो सतत प्रयत्नशील राहील, असे त्यांनी नमूद केले.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीला दिलेल्या आदेशात अतिक्रमण हटवताना अर्जदाराशी चर्चा करूनच कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पुढील दिशा काय ठरेल आणि नगरपंचायत नेमकी कोणती भूमिका घेईल, याकडे संपूर्ण बोदवडकरांचे लक्ष लागले आहे.



