


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य शासनाची स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) यांच्या वतीने भुसावळ येथे २ ते १३ जुलै २०२६ या कालावधीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये २० प्रशिक्षणार्थींना सहभागी करून घेण्यात येणार असून, स्थानिक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील युवकांमध्ये उद्योजकतेची मानसिकता विकसित करणे, स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे आणि नवउद्योजक घडविणे हा या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. प्रशिक्षणाचे आयोजन ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांत करण्यात आले असून, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग उभारणीचे व्यावहारिक मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भुसावळ शाखेचे भूषण आग्रे, के.सी.ई. सोसायटी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. नितीन मटकरी तसेच अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय दीपक गुप्ता आणि प्रद्योत कुलकर्णी यांचेही विशेष मार्गदर्शन आणि सहकार्य प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे.
प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, उद्योग व्यवस्थापन, ग्राहक व्यवस्थापन, डिजिटल व्यवहार, अमृतपेठ आणि अमृतपेठ ऑफलाइन उपक्रम, वैयक्तिक व्याज परतावा योजना, ड्रोन पायलट मिशन तसेच शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले आर्थिक नियोजन, विपणन कौशल्य आणि व्यवसाय व्यवस्थापन याविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे युवकांना रोजगार शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक माहिती आणि कौशल्य या प्रशिक्षणातून उपलब्ध होणार आहे.



