


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील रथ चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत इमारतीखाली उभी असलेली एक चारचाकी गाडी पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, परिसरातील आणखी एका जीर्ण इमारतीला मोठे तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
माहितीनुसार, रथ चौक परिसरातील ही इमारत सुमारे दोन वर्षांपूर्वी अंशतः पाडण्यात आली होती. मात्र उर्वरित भाग तसाच धोकादायक अवस्थेत ठेवण्यात आला होता. बुधवार, दि. १ जुलै २०२६ रोजी पहाटे अचानक या इमारतीचा उर्वरित भाग कोसळल्याने खाली उभी असलेली चारचाकी गाडी ढिगाऱ्याखाली दबली. या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही महापालिका प्रशासनाकडे संबंधित जीर्ण इमारतीबाबत अनेक वेळा तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रशासनाने वेळेत ठोस उपाययोजना न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे.
घटनेनंतर युवासेनेनेही प्रशासनाच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरातील धोकादायक व जीर्ण इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात युवासेनेच्या शिष्टमंडळाने जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त आदित्य जिवने यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण, स्ट्रक्चरल ऑडिट आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर आयुक्त आदित्य जिवने यांनी संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे, अजय खैरनार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने व्यापक सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही होत आहे.



