जळगाव प्रतिनिधी । बोदवड परिसर सिंचन योजनेला ४३३.४३ कोटी रूपयांचा केंद्रीय निधी मिळणार असून ही योजना मार्गी लागणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी दिली.
नवी दिल्लीतील श्रमशक्ती भवन येथे महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्पांबाबत महत्वाची बैठक झाली. यानंतर जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी केंद्राकडून मंजूर निधीपैकी उर्वरित ४३३ कोटी ४४ लाखांचा निधी राज्याला मिळणार असून या प्रकल्पाच्या कामाला गती येणार आहे. या योजनेसाठी केंद्राकडून द्यावयाचा उर्वरित ४३३ कोटी ४४ लाखांचा निधी राज्याला लवकरच देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. या संबंधात केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागार समितीला मंत्री गडकरी यांनी बैठकीत सूचना दिल्या आहे.
बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी वर्ष २०१२ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने ५०० कोटी रूपये विशेष सहायता निधी म्हणून मंजूर केले होते. यानुसार २०१४-१५च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली. पैकी केंद्राकडून प्रत्यक्ष ६६.६६ कोटींचा निधीच राज्याला प्राप्त झाला. यानंतर केंद्राकडून राज्याला निधी उपलब्ध झालेला नसल्याने या प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावला आहे. हा प्रकल्प वर्ष २०२० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून केंद्राकडून उर्वरित निधीची मागणी बैठकीत मंत्री महाजन यांनी केली. तसेच या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवर उभारण्यात येणार्या सात बलून बंधार्याला केंद्र शासनाकडून अनुदान व राज्यातील पाच गरजू जिल्ह्यात केंद्रीय योजनांमधून सिंचन व्यवस्था बळकट करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहितीदेखील ना. महाजन यांनी दिली.