बोदवड प्रतिनिधी । वादग्रस्त पुस्तकाप्रकरणी मत प्रदर्शन करतांना महापुरूषांची बदनामी करणार्या दोघांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी बोदवड पोलिसांकडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील जामठी येथील रहिवासी डॉ.सतीश आगीवाल व संदीप शर्मा यांनी अनुक्रमे युवा मोर्चा महाराष्ट्र व हॅलो जामठी न्युज या व्हाट्सएपच्या ग्रुप वर आजके शिवाजी नरेंद्र मोदीया पुस्तकाचे समर्थन करतांना त्यांनी आक्षेपार्ह पध्दतीत छत्रपती शिवाजी महाराज व स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान या दोन्ही राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वांचा अपमान केला आहे. यामुळे आम्हा समस्त शिव प्रेमींच्या भावना दुखावल्या आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज व प्रथम स्वातंत्र्य सेनानी टिपू सुलतान हे दोघेही राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही.म्हणून या राष्ट्रीय व्यक्तिमत्वांचे अपमान करणार्या संदीप शर्मा व डॉ.सतीश आगीवाल हे (दोन्ही रा.जामठी ता.बोदवड) यांच्यावर व युवा मोर्चा महाराष्ट्र ग्रुप अॅडमिन विक्रम वरकड (रा.जामठी ता.बोदवड) या तीन लोकांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा आंदोलन केले जाईल व आंदोलनात शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा काही जीवित हानी झाल्यास प्रशासन त्याला सर्वस्वी जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांना निवेदन देतेवेळी अनंता वाघ, कलिम शेख,संजय काकडे,श्रीराम शेळके, पुरुषोत्तम पाटील, नाजीम पिंजारी, शेख लतिफ, विशाल तांगडे, प्रमोद धामोडे, संजय पाटील,पवन लव्हाळे,नईम खान,निलकंठ पाटील यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.