मंगळग्रह मंदिरात पारंपरिक पद्धतीने मंगल जन्मोत्सव साजरा

अमळनेर, प्रतिनिधी  ।   येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात पारंपारिक पद्धतीने श्री मंगळ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या जन्मोत्सव महापूजेचे मानकरी औरंगाबाद येथील संजय चव्हाण होते.

 

 

श्री मंगळ जन्मोत्सवानिमित्ताने मंदिरात पहाटे चारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात प्रथम पहाटे चार वाजता पंचामृत अभिषेक करण्यात आला. सकाळी सहा वाजता श्री मंगळग्रहाची पंचधातूची उत्सवमूर्ती सजविलेल्या पाळण्यात ठेवून जन्मोत्सव झाला. दरवर्षाप्रमाणे मंदिराच्या कळसावरील व  प्रवेश द्वारावरील ध्वज बदलविण्यात आले.  ध्वजाचे मानकरी स्वर्णलंकार व्यापारी तथा बिल्डर योगेश पांडव नवे ध्वज घेऊन सहकुटुंब – सहपरिवार सकाळी सातला मंदिरात पोहोचले. प्रवेशद्वाराजवळ विधिवतरित्या दोन्ही ध्वजांचे पूजन झाले. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते मंदिरापर्यंत वाजत – गाजत ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली . विधिवतरित्या ध्वजारोहण झाले.

औरंगाबाद येथील सुवर्णालंकार व्यापारी सुनील गोलटगावकर यांनी जन्मोत्सवानिमित्त मंदिरातील श्री भूमी मातेला चांदीचा मुकुट भेट दिला.  जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण मंदिर परिसरात सर्वत्र केळीचे खांब, आंब्याच्या पानाचा पताका, मंदिराला विविध रंगी ताज्या फुलांनी मनोहारित्या सजविण्यात आले होते. दरवर्षी जन्मोत्सवाला श्री मंगळदेव ग्रहाच्या मूर्तीला वेगवेगळ्या रुपात सजविण्यात येते. यावर्षी  मूर्तीला सिंहसनस्थ राजेशाही रूप देण्यात आले होते. मिरवणुकीत व कार्यक्रमात मंदिराच्या सेवेकाऱ्यांचा लाल – पांढरा पारंपारिक गणवेश व मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत सेवारत असलेल्या माजी सैनिकांचा कमांडो  गणवेश लक्षवेधी ठरला. भाविकांना जन्मोत्सवाचा वैशिष्टपूर्ण पंजीरी व खोबरा बर्फीचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले ,उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर,  सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी,  विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, विनोद कदम, विनोद अग्रवाल, हरिओम अग्रवाल,  एम.जी. पाटील, जी. एस. चौधरी  आदींसह स्थानिक व    परगावाचे भाविक उपस्थित होते. प्रसाद भंडारी मुख्य पुरोहित होते. त्यांना मंदिराचे पुजारी तुषार  दीक्षित, जयेंद्र वैद्य, अक्षय जोशी, मेहुल कुलकर्णी, निलेश भंडारी यांनी सहकार्य केले.

Protected Content