बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नोंदी करण्यास टाळाटाळ करणार्या नगरपालिकेच्या अधिकार्यास मायलेकाने मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, बोदवड शहरातील रहिवासी रोशन पठाण यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्या मालमत्तेवर पत्त्नी सोफीया पठाण आणि मुलगा गुलजार पठाण यांची नावे लावण्यासाठी त्यांनी नगरपालिकेत अर्ज केला होता. मात्र त्यांची नोंद करण्यात आली नव्हती.
दरम्यान, याबाबत जाब विचारण्यासाठी सोफिया पठाण आणि त्यांचा मुलगा गुलजार हे मंगळवारी नगरपालिका परिसरात आले होते. यावेळी त्यांना कार्यालय अधिक्षक राजूसिंग चव्हाण भेटले. या मायलेकाने नोंदीबाबत विचारणा केली असता चव्हाण तेथून निघून गेले.
यानंतर राजू चव्हाण हे थोड्या वेळाने नगरपालिका कार्यालयात परत आले असता सोफिया पठाण आणि गुलजार पठाण यांनी त्यांना मारहाण केली. उपस्थितांनी त्यांना आवरले. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याबाबत रात्री उशीरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.