बोदवड येथील वैष्णवीच्या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर निवड

बोदवड प्रतिनिधी । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वैष्णवी पाटील हिच्या संत्रीच्या सालीचा वैद्यकीयदृष्ट्या उपयोग या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी निवड झाली आहे.

ग्रामीण भागात कौशल्य विकास करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. मात्र, दीर्घकाळ टिकणारे परिवर्तन घडवून आणण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पना अमलात आणणे, त्यासाठी व्यावसायिक कौशल्यांचा वापर करण्याचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षा परिषदेच्या सामाजिक उद्योजगता, स्वच्छता व ग्रामीण सहभाग विभागाने विविध व्यवसायाच्या कल्पना या स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात बोदवड येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भाग्यश्री सोनोने व वैष्णवी पाटील या दोन विद्यार्थिनी देखील सहभागी झाल्या होत्या.

यात वैष्णवी पाटील हिच्या संत्रीच्या सालीचा वैद्यकीयदृष्ट्या उपयोग या प्रयोगाची राष्ट्रीय स्तरावर सादरीकरणासाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी मेंटोर म्हणून महाविद्यालयातील आयक्यूएसीचे समन्वयक, रासेयोचे कार्यक्रम अधिकारी व भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. अनिल बारी यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. स्पर्धेत सहभागाचे प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. मार्च महिनाअखेर प्रादेशिक स्तरावरील स्पर्धेचे आयोजन होईल. तर राष्ट्रीय स्तरावरील सादरीकरण कोविड-१९ परिस्थिती पाहून प्रत्यक्ष किवा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. भाग्यश्रीच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content