प्रेम संबंधातून ग्रामपंचायत सदस्याचा खून : नऊ जणांना अटक

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्याचा प्रेम संबंधातून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुक्तळ येथील २९ वर्षीय ग्रामपंचायत सदस्य शिवाजी गोकुळ पारधी यांना मारहाण, गळ्यावर धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. नंतर त्यांचा मृतदेह बोदवड शिवारातील मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला. शिवाजी पारधी हे मुक्तळ येथील ग्रामपंचायत सदस्य आहेत. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत ६ मार्चला रात्री त्यांचे भाऊ सुनील गोकुळ पारधी यांनी बोदवड पोलिसांत मिसिंगची नोंद केली. दरम्यान, रविवारी रात्री मलकापूर रोडवरील पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी काही वेळातच ओळख पटवली. मृतदेह शिवाजी पारधी यांचा असल्याचे समोर येताच अवघ्या काही तासांत सोमवारी दुपारी २ वाजता संशयितांना अटक केली.

या प्रकरणी रविना उर्फ धनश्री सचिन कोल्हे (वय २१), सचिन श्रीधर कोल्हे (वय ३२), श्रीधर रामधन कोल्हे (वय ५९), अमोल श्रीधर कोल्हे (वय ३०), नितीन भास्कर कोल्हे (वय ३२), निर्मलाबाई श्रीधर कोल्हे (वय ५०, सर्व रा.मुक्तळ) तसेच पुंडलिक यशवंत वारके (वय ४९) व पल्लवी पुंडलिक वारके (वय ३६, रा. शिंदी ता.भुसावळ) आदींचा समावेश आहे.

या घटनेत प्रेम प्रकरणाचा संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. एका विवाहित तरुणीसोबत मृत शिवाजी पारधी यांचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून शिवाजी पारधी यांना मारहाण व त्यांच्यावर वार करून त्यांना ठार करण्यात आले. नंतर त्यांचा मृतदेह ५ मार्चच्या रात्री दीड वाजता मलकापूर रोडवरील पुलाखाली फेकून दिला होता, अशी फिर्याद देण्यात आली.
याप्रकरणी सुनील गोकुळ पारधी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. आरोपींना सोमवारी बोदवड न्यायालयात हजर केल्यावर ११ मार्चपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करत आहेत.

Protected Content