बोदवड- सुरेश कोळी | मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथराव खडसे यांच्यात नव्याने वाद झाला असून याला निमित्त ठरले ते ध्वजारोहणाचे !
आमदार चंद्रकांत पाटील आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असून दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत असल्याचेही अनेकदा दिसून आले आहे. असाच एक प्रकार पुन्हा एकदा घडला आहे.
बोदवड येथील तहसील कार्यालयात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून १०० फूट उंच ध्वज स्तंभ उभारण्यात आला असून स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी तहसील कार्यालयाकडून ९.३५ वाजेची वेळ ठरवली होती. दरम्यान, आमदार चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकातील तिरंगा लोकार्पण सोहळ्यास उपस्थित असल्यामुळे त्यांच्या वतीने संगांयो समिती अध्यक्ष डॉ.उद्धव पाटील हे येथील तहसील कार्यालयात ध्वजारोहण करणार असल्याचे नियोजन करण्यात आले होते.
दरम्यान, ९ वाजेच्या सुमारास आमदार एकनाथराव खडसे यांनी तहसील कार्यालयात सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी ध्वजारोहण केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली. दरम्यान, ध्वजारोहणासाठी ९.३५ ची वेळ असताना येथे ९.१० ते ९.२० या वेळेत ध्वजारोहण करण्यात आले. हा प्रकार घडल्यानंतर नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी तहसीलदार श्वेता संचेती यांच्या दालनात आंदोलन करून ठिय्या मांडल्याने काही काळ तणावाचे वातावरण पसरले. राष्ट्रध्वज संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची व चौकशीची मागणी आंदोलकांनी केली. यावर तहसीलदारांनी या प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पत्र नगराध्यक्ष पाटील यांना दिले. यामुळे आता या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या माध्यमातून पाटील विरूध्द खडसे संघर्षाचा नवीन अंक सुरू झाल्याचेही अधोरेखीत झाले आहे.