जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक रक्तदाता दिनानिमीत्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) विभागातर्फे विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, डॉक्टरांनी शुक्रवारी १४ जून रोजी दुपारी रक्तदान केले. शिबीरात ४० पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) विभागातर्फे आयोजित या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी उदघाटन केले. त्यानंतर विकृतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. दीपक शेजवळ यांनी जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व विशद केले. त्यानंतर रक्तदान शिबीराला सुरूवात झाली. शिबीरात प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, कर्मचारी असे ४० दात्यांनी रक्तदान केले. तसेच २० पेक्षा अधिक वेळा रक्तदान करणारे डॉ. योगेंद्र नेहेते यांचा अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर म्हणाले की, आपल्या शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत कायम रक्ताची मागणी असते. त्याकरिता जिल्ह्यातील विविध संघटनांनी, राजकीय पक्षांनी, महाविद्यालयांनी रक्तपेढीशी संपर्क करून वेळोवेळी रक्तदान शिबिरे घेतली पाहिजे. या संकलित रक्ताचा लाभ गोरगरीब, दुर्गम भागातील जनतेला नक्कीच मिळेल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिबिरासाठी (०२५७-२२२२९१७, किंवा ९२८४४९७७०५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
शिबीरप्रसंगी अस्थिव्यंगोपचार विभाग प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी, प्रा. डॉ. भरत बोरोले, डॉ. योगेंद्र नेहेते, महाराष्ट्र कनिष्ठ निवासी संघटना, जळगावचे अध्यक्ष डॉ. भावेश खडके यांची उपस्थिती होती. डॉ. कुणाल देवरे, डॉ. पूजा खांडवे, डॉ. अफ्रिन सिद्दीकी, डॉ. पल्लवी पावरा, डॉ. नम्रता वाघ, डॉ. अश्विनी तायडे, डॉ. शामली नावडे, डॉ. मिनू वर्गीस यांच्यासह रक्तपेढीचे कर्मचारी प्रभाकर पाटील, राजेश शिरसाठ, दीपक होनमाने, कपिल पाटील, कल्पेश गावंडे, राजू कुलकर्णी, विजय बागुल आदींनी परिश्रम घेतले.