यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालयात अन्नपूर्णा नागरी पतसंस्था आणि रेड क्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, मनीष चौधरी, भैय्यासाहेब चौधरी, राजेश वाणी, अरुण कुलकर्णी, कौत्तीक बोडदे नाना यांच्यासह अन्नपूर्णा नागरी पतसंस्थेचे पदाधिकारी, रेड क्रॉस सोसायटीचे पदाधिकारी आणि शाळेचे शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक जबाबदारी म्हणून नियमित रक्तदान करावे, असे आवाहन केले. अपघातग्रस्त, गंभीर आजारांनी त्रस्त रुग्ण तसेच शस्त्रक्रिया होणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदान हे जीवनदान ठरत असल्याचे वक्त्यांनी नमूद केले. समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.
रक्तदान शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अन्नपूर्णा नागरी पतसंस्था, रेड क्रॉस सोसायटी आणि शाळा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.



