काबूल (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तब्बल ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक जण जखमी असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित असताना हा स्फोट घडवण्यात आल्याची माहिती आहे. अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास झाला. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत काहीच सांगता येत नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहीमी यांनी सांगितले. दरम्यान,घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही. या भागात अल्पसंख्याक शिया हजारा समुदायाचे लोक मोठ्या संख्येने राहतात.