जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बळीरामपेठेतील दुर्गादेवी चौकात घरगुती गॅसचा काळाबाजार करुन वाहनांमध्ये बेकायदेशीररित्या घरगुती वापराचा गॅस भरुन देणाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. कारवाईत ४ लाख १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील बळीरामपेठेत गंगूबाई शाळेसमोर दुर्गा देवी चौकात अनधिकृतपणे काही जण वाहनांमध्ये घरगुती गॅस भरुन देत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल फुला यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. त्यानुसार पथकाने सोमवारी सायंकाळी घटनास्थळ गाठले. याठिकाणी दहा १२ जण घरगुती गॅस सिलेंडरमधून रिक्षात तसेच चारचाकी वाहनांमध्ये भरतांना रंगेहाथ सापडले. त्यानुसार पथकाने कारवाई करुन गॅस भरण्याचे मशीन, सिलेंडर तसेच इतर साहित्य असा एकूण ४ लाख १५ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरिक्षक राहूल फुला यांच्या फिर्यादीवरुन नाजिक खान नईम खान पठाण, फिरोज खान सलीम खान ऊर्फ फौजी, अब्दुल रज्जाक रंगरेज, शेख सोनू एजाज, प्रकाश लक्ष्मण वारुळे, दिपक घनशाम पाटील, गणेश काशिनाथ गोवे, महादू शंकर तेलंग, दिलीप ओंकार सोनवणे, सिकंदर शब्बीर शेख, विजय देवराम सोनवणे व जितेंद्र वसंत चौधरी या १२ जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकुंभ हे करीत आहेत.