भाजपचे पराग शाह यांच्याकडे तब्बल ५०० कोटीची संपत्ती

shirmant manus

 

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना डावलून भाजपने उमेदवारी दिलेले नगरसेवक पराग शाह हे विधानसभा निवडणुकीतील राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. पराग शाह यांची एकूण संपत्ती ५०० कोटी असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून भाजपने पराग शाह यांना घाटकोपर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच शाह यांनी काल अर्ज दाखल केला. निवडणूक अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार त्यांची संपत्ती अंदाजे ५०० कोटी इतकी आहे. यात त्यांच्या पत्नीच्या नावावरील संपत्तीचाही समावेश आहे. ५० वर्षीय शाह यांनी व्यवसाय व गुंतवणूक हे आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून दाखवले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये ७८ कोटींची स्थावर तर, ४२२ कोटींची जंगम मालमत्ता आहे. शाह पती-पत्नीच्या नावावर तब्बल २९९ कोटींचे शेअर्स आहेत. तर, व्यावसायिक, निवासी, कृषी व बिगरकृषी अशा १० स्थावर मालमत्ता आहेत. महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावे शेतजमीन आहे. त्यांच्याकडं २ कोटी ६ लाखाचे दागदागिने आहेत. ९ लाखांची स्कोडा कार आणि २ कोटी ४७ लाखांची फेरारी गाडी आहे.

शाह हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीच्या दोन कंपन्या आहेत. मुंबईसह गुजरात व चेन्नईमध्ये त्यांचे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. २०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून शाह हे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी ६९० कोटींची संपत्ती जाहीर केली होती.

Protected Content