राष्ट्रवादीचे माजी खा. पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Shivesena news

मुंबई वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात संजय पाटील यांचा शिवसेनेला फायदा होण्याची शक्यता आहे. कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान संजय पाटील यांना मानखुर्दमध्ये जास्त मते मिळाली होती. दरम्यान शिवसेनेकडून विठ्ठल लोकरे यांनी मानखुर्दमधून अर्ज भरला असला तरी रिपाइंकडून गौतम सोनवणे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. पाटील यांनी 2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तिकीटावर ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली असून 15 व्या लोकसभेत विजय मिळवून खासदार बनले होते. परंतु 2014 मध्ये मोदी लाटेमुळे त्यांचा पराभव झाला आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मनोज कोटक यांच्याकडून ते पराभूत झाले होते.

मुंबईतील राष्ट्रवादीची ताकद संपली?
सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर मुंबई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जवळपास संपल्यात जमा आहे. तर ईशान्य मुंबईत संजय पाटील यांनी पक्ष सांभाळला होता. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील बडे नेते गणेश नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता केवळ जितेंद्र आव्हाड यांच्या रुपाने मुंबई उपनगरात राष्ट्रवादीचे अस्तित्त्व कायम आहे.

Protected Content