बोदवड प्रतिनिधी | येथील प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना समसमान मते मिळाल्यानंतर ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली असून यात भाजपच्या विजय बडगुजर यांना नशिबाने साथ दिल्याने ते विजयी झाले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, बोदवड नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी सुरू करण्यात आलेली आहे. यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रचंड चुरशीची लढत पहायला मिळत आहेत. पहिल्या सहा प्रभागांमध्ये राष्ट्रवादीला तीन तर शिवसेनेला दोन जागा मिळाल्या आहेत. तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादीचे गोपाळ गंगतिरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान म्हणजे ३७४ मते मिळालीत. यामुळे ईश्वरचिठ्ठीने यातील विजेता ठरविण्यात आला. यात नशिबाचा कौल हा भाजपचे उमेदवार विजय बडगुजर यांना मिळाला. यामुळे ते विजयी झाले आहेत. या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने बोदवडमध्ये खाते उघडले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी तीन, शिवसेना दोन आणि भाजपला एका जागेवर यश मिळाले आहे.