भाजप नेत्यांचे चप्पल घालून आंदोलन : शिवसेनेने केले शुध्दीकरण !

मुक्ताईनगर प्रतिनिधी । घंटानाद आंदोलनाच्या अंतर्गत येथील मुक्ताई मंदिरात भाजप नेते व पदाधिकार्‍यांनी चपला घालून आंदोलन केल्यानंतर शिवसेना व युवासेनेने मंदिरासह परिसराचे शुध्दीकरण केले. यामुळे येथे भाजप व सेनेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे.

मंदिरे उघडण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी भाजपने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात मुक्ताईनगर येथे संत मुक्ताबाई मंदिराच्या सभा मंडपात भाजपचे नेते आणि प्रमुख पदाधिकार्‍यांनी देखील आंदोलन केले. या आंदोलनाच्या दरम्यान चप्पल घालून घंटानाद करण्यात आला होता. याचा निषेध म्हणून शिवसेना, युवासेनेतर्फे रविवारी मंदिरात गोमुत्र आणि दुग्धाभिषेक करीत मंत्रोपचारात मंदिर शुद्धीकरण करण्यात आले.

संत मुक्ताबाई मंदिरात भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. मंदिराच्या सभामंडपात आंदोलन करताना भाजप कार्यकर्त्यांनी चप्पल-बुट घालून घंटानाद केला. या आंदोलनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी चप्पल आणि बुटासह मंदिरात प्रवेश केल्याने मंदिर अपवित्र झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अनुषंगाने शिवसेना व युवासेनेतर्फे मंदीराचे शुद्धीकरण करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यासह संपूर्ण परिसरात गोमुत्र शिंपडण्यात आले. मंदीरात गोमुत्र आणि दुग्धाभिषेक करण्यात आला. पुजार्‍यांकडून मंत्रोपचार करीत मंदिराच्या शुद्धीकरणाचे सोपस्कार करण्यात आले. याप्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पवन सोनवणे, तालुकाप्रमुख पंकज राणे, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, शहर संघटक वसंत भलभले, शहरप्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराळे, दीपक कोळी, रवी दांडगे, शुभम शर्मा , नामदेव भिल्ल, तानाजी पाटील आदी सहभागी होते.

तर दुसरीकडे राज्य सरकार हे कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप खासदार रक्षाताई खडसे यांनी केला आहे. आरोप करणार्‍यांनी अगोदर आमच्या पायातील चपला, बूट न पाहता राज्यातील महाविकास आघाडीची कामगिरी पहावी. दारूची दुकाने आणि बाजारपेठ उघडली असताना मंदिरे का बंद आहेत? याचा शोध घ्यावा. हे सरकार कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप खासदारांनी केला आहे.

Protected Content