दिल्लीत भाजप सुसाट : ‘आप’ला जोरदार धक्का !


नवी दिल्ली-वृत्तसेवा | दिल्ली विधानसभेच्या आज झालेल्या मतमोजणीतून भारतीय जनता पक्षाला दणदणीत बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून तब्बल 27 वर्षानंतर येथे कमळ फुलले आहे.

दिल्ली विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा मोठी चुरस दिसून आली. निवडणुकीआधी आम आदमी पक्ष व काँग्रेसची आघाडी होणार असल्याची चर्चा होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही, यामुळे येथे तिरंगी सामना रंगला. निवडणुकीच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या अनेक फैरी झडल्या. यात प्रामुख्याने यमुना नदिच्या पाण्याच्या प्रदूषणावरून मोठे रणकंदन झाले. यात 5 फेब्रुवारी रोजी 90 जागांसाठी मतदान झाले.

आज सकाळी आठ वाजता दिल्ली विधानसभेच्या मतदानाची मोजणी करण्यात आली. यात प्रारंभी पोस्टल आणि नंतर मतदान यंत्रांची मोजणी करण्यात आली. पोस्टल फेरीपासून भाजपने घेतलेली जोरदार आघाडी ही ईव्हीएमच्या मत मोजणीतून देखील कायम राहिली आहे. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास दिल्लीतील 90 पैकी 42 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असून सत्ताधारी आम आदमी पक्षाला 28 जागांवर आघाडी मिळाली आहे. यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र दिसून आले आहे. शेवटच्या फेऱ्यांमध्ये फार मोठा उलटफेर न झाल्यास दिल्लीत भाजपला दणदणीत बहुमत मिळणार असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे.