भाजपचा इलेक्शन मोड : ‘खडसे इफेक्ट’ विरूध्द लेवा पाटीदार चेहर्‍यांना पाठबळ !

जळगाव-जितेंद्र कोतवाल (एक्सक्लुझीव्ह पॉलिटीकल ॲनालिसीस ) | आज भारतीय जनता पक्षाने तीन जिल्हाध्यक्षांची निवड करतांना लेवा आणि मराठा चेहर्‍यांमध्ये समतोल ठेवला आहे. तर एकनाथ खडसे यांच्या नंतर लेवा पाटीदार समाजाला आकर्षीत करण्यासाठी झुकते माप देण्यात आलेले आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

येत्या दीड वर्षात लोकसभा आणि विधानसभेसह अनेक महत्वाच्या निवडणुकात होणार आहेत. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही समावेश आहे. भारतीय जनता पक्षासाठी पहिले प्राधान्य हे साहजीकच लोकसभा निवडणुकीचे आहे. कोणतीही ‘रिस्क’ न घेता लोकसभेच्या दोन्ही जागांवर पुन्हा एकदा विजय संपादन करण्याची रणनिती आखण्यात आलेली आहे. तसेही दोन्हीकडे अल्प अपवाद वगळता गेल्या ३० वर्षांपासून भाजपचेच उमेदवार निवडून येत असल्याने दोन्ही जागा काबीज करणे सहजसोपे दिसून येत असले तरी प्रत्यक्षात तसे नाही. दोन्ही ठिकाणी काही प्रमाणात तरी आव्हाने असल्याचेच दिसून येत आहे.

हे देखील वाचा : झाले अमोल जावळेंचे राजकीय लॉंचींग झाले !

दोन्ही लोकसभा मतदारसंघापैकी रावेरचा उल्लेख येताच साहजीकच एकनाथराव खडसे यांना लक्षात घेणे गरजेचे आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत खडसे हे भाजप उमेदवाराच्या विरोधात असतील हे निश्‍चीत आहे. तर त्यांच्या सूनबाई रक्षाताई खडसे यांना भाजपकडून तिकिट मिळण्याची शक्यता धुसर असल्याचे राजकीय निरिक्षकांचे मत आहे. यातच भारतीय जनता पक्षाकडून नाथाभाऊंवर अन्याय झाल्याची भावना त्या परिसरातील समाजबांधवांमध्ये आहे. किंबहुना भाजपने हे गृहीत देखील धरले असावे. याचेच डॅमेज कंट्रोल करण्याचे काम जिल्हाध्यक्ष निवडीतून करण्यात आल्याचे दिसून येत आहे. यात आधी देखील आमदार राजूमामा भोळे हेच ग्रामीण जिल्हाध्यक्ष असल्याने लेवा पाटीदार समाजाला प्रतिनिधीत्व होते. आता अमोल जावळे यांच्या रूपाने समाजाचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद कायम ठेवण्यात आलेले आहे. तर उज्वला बेंडाळे यांच्या रूपाने याच समाजाला अतिरिक्त प्रतिनिधीत्व प्रदान करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर, तरूण चेहर्‍यांना संधी

एकनाथराव खडसे यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लेवा पाटीदार समाजबांधवांची मते जाऊ नयेत म्हणून रावेरच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. राजकारणात पदार्पण होतांनाच थेट मोठे पद मिळाल्याची बाब ही लक्षणीय आहे. तर महानगराध्यक्षा उज्वला बेंडाळे या सुशिक्षीत आणि अनुभवी नेत्या मानल्या जातात. त्यांना देखील मोठे पद देऊन पक्षाने योग्य तो संदेश दिलेला आहे. त्यांच्या पाठीशी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्यासह पक्षाचे मातब्बर नेते उभे असल्याने आगामी वाटचालीत त्यांना फार अडचणी येणार नाहीत असेही मानले जात आहे. या सर्व घडामोडींमध्ये अमोल जावळे आणि उज्वला बेंडाळे यांचा एकनाथराव खडसे यांच्याशी थेट सामना होणार नाही. तथापि, समाजबांधवांमध्ये योग्य तो संदेश देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने अचूक टायमिंग साधल्याचेही यातून दिसून येत आहे.

भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्राधान्याने एकनाथराव खडसे यांच्या चेहर्‍याचेच प्रमुख आव्हान असेल. रावेर लोकसभा मतदारसंघात प्रकर्षाने त्यांची ताकद जास्त आहे. यामुळे हे आव्हान मोडून काढत विजय संपादन करण्यासाठी याच भागातील निर्णायक असणार्‍या लेवा पाटीदार समाजातील चेहरा आवश्यक होता. अमोल हरीभाऊ जावळे यांच्या सारख्या कोरी पाटी असणार्‍या तरूणाला त्यांच्या समोर उभे करण्यात आले आहे. ही लढाई अर्थातच सोपी नाही. या तगड्या फाईटमध्ये कुणाची सरशी होणार ? हे तर येणारा काळच ठरवणार आहे.

Protected Content