फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात आमदार एकनाथ खडसे यांनी केलेल्या कथित अश्लील आणि अपमानास्पद वक्तव्याचा फैजपूर शहर भारतीय जनता पार्टीच्या (भाजप) कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध केला आहे. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फैजपूरच्या प्रांत अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले.
निवेदनात भाजप कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, आमदार एकनाथ खडसे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत खालच्या स्तराचे असून, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. खडसे यांची ही कृती निंदनीय असून, त्यांनी त्वरित जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. अन्यथा, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील, असे नमूद करत आमदार खडसे यांची भाषा राजकीय सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारी आहे आणि या वक्तव्यामुळे त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. सार्वजनिक जीवनात अश्लील भाषा आणि खालच्या पातळीवरील टीका खपवून घेतली जाणार नाही, असे ठाम मत भाजपने व्यक्त केले आहे.

या निषेध आंदोलनात आणि निवेदन सादर करताना भाजपचे माजी नगराध्यक्ष निलेश (पिंटू) राणे, माजी नगरसेवक राकेश जैन, सामाजिक कार्यकर्ते गोटू भारंबे, रामा होले, वैभव वकारे, पराग पाटील, अक्षयसिंह परदेशी, मनोज चौधरी, गोलू चौधरी, हेमराज चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एकनाथ खडसे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या माफीची मागणी केली.


