दिल्ली वृत्तसंस्था । माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी गौतमने पोलीस ठाण्याला पत्र लिहून माहिती दिली आहे.
भाजप खासदार गौतम गंभीर क्रिकेटसह विविध मुद्द्यांवर नेहमीच रोखठोक मते मांडत असतो. त्यामुळे तो कायम चर्चेत असतो. यावेळी मात्र, त्याला फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने चर्चेत आला आहे. काही अनोळखी व्यक्तींकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे त्याने सांगितले. यासंबंधी त्याने दिल्ली पोलिसांना पत्राद्वारे माहिती देऊन तक्रार नोंदवण्यास सांगितले आहे. दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्तांना त्याने यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ‘मला आणि माझ्या कुटुंबीयांना ठार मारण्यात येईल अशा धमकीचा फोन आला होता. एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात यावा, अशी विनंती मी करत आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवण्यात यावी,’ असे गंभीरने पोलीस उपायुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तक्रार नोंदवून घेतली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे, असे समजते.