इंदूरमध्ये भाजप नेत्याची गोळया झाडून हत्या

इंदूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मोनू कल्याणे असे मृताचे नाव असून, इंदूरच्या एमजी रोड पोलिस स्टेशन परिसरात ही हत्या करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मोनू कल्याणे हे मध्य प्रदेशचे भाजपचे दिग्गज नेते मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्या जवळचे होते. या घटनेमुळे इंदूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे मोनू कल्याणेवर गोळ्या झाडण्यात आल्या. यानंतर मोनूला त्याच्या मित्रांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एमजी रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चिमणबाग परिसरात जुन्या वैमनस्यातून पीयूष आणि अर्जुन नावाच्या आरोपींनी मोनूवर गोळ्या झाडल्या आणि फरार झाले. पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेतली असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि त्यांचा मुलगा आकाश विजयवर्गीय यांनी मोनूच्या घरी जाऊन पीडित कुटुंबाला धीर दिला. दरम्यान, परिसरात तणावपूर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसही तैनात करण्यात आले आहेत.

Protected Content