बोगस शिक्षक भरती प्रकरणी नगरदेवळा येथील पवार विद्यालयाची अखेर चौकशी सुरू

पाचोरा प्रतिनिधी । येथील सरदार एस.के. पवार माध्यमिक विद्यालयातील बोगस शिक्षक भरतीसह अन्य विषयांची तक्रारीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी कल्पना चौहान यांनी प्रत्येक्षात शाळेला भेट देऊन तीन तास कसून चौकशी केली असून लवकरच संबंधित अहवाल उपसंचालक, नाशिक विभाग यांना पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले. या चौकशीने गावात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तत्कालीन शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांच्या स्कॅन केलेल्या सहीचा आधार घेऊन सरदार एस. के. पवार विद्यालयासह जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती झाली असल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने इतर शाळेंच्या चौकश्या झाल्या असून त्याप्रकरणी तत्कालीन संचालक बच्छाव व शिक्षण अधिकारी देवीदास महाजन यांना निलंबित केले आहे. तसेच देविदास महाजन यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला माझ्या सहीचा दुरुपयोग झाल्याची तक्रार दाखल केली आहे. परंतु नगरदेवळा ता. पाचोरा येथील शाळेची चौकशी झाली नसल्याने हा तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला होता. याआधीही एकाने तक्रार दाखल केली होती परंतु शाळेच्या संचालकांनी त्याला भरती करून घेण्याचे आश्वासन देऊन तक्रार मागे घेण्यास लावली होती. या चौदा बोगस शिक्षकांच्या भरतीत त्या तक्रारदाराच्या प्रतिनिधीचा समावेश आहे. एकीकडे माहिती अधिकारात माहिती मागितली असता मुख्याध्यापक सांगतात की, सन – २००५ पासून आमच्या संस्थेत विनाअनुदानित तुकडीच नसल्याने शिक्षक भरतीचा प्रश्नच येत नाही आणि दुसरीकडे शिक्षण विभागाकडून माहिती घेतली असता सन – २०१३ मध्ये चौदा शिक्षकांची शालार्थ आय. डी. काढण्यात आल्याची माहिती मिळते. यात शिक्षक भरती करते वेळी लाखो रुपये संस्था चालकांनी घेतले असल्याची गावात चर्चा आहे. त्यामुळे या संस्थेत सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची संपुर्ण चौकशी होऊन संचालक मंडळावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. झालेल्या चौकशीत तक्रारदार स्वतः हजर झाले होते व संचालक मंडळातील काही सभासद शिक्षक हजर होते. या चौकशीमुळे गावात एकच खळबळ उडाली असून निस्वार्थ व पारदर्शक चौकशी झाल्यास संस्थेचा मनमानी व बेकायदेशीर भ्रष्टाचार लवकरच चव्हाट्यावर येईल.

Protected Content