मुंबई प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागली असल्याचा आरोप करून हे शिवसेनेविरूध्दचे दुर्योधनी षडयंत्र असल्याचा आरोप आज शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या सामनातून आज अपेक्षेनुसार राष्ट्रपती राजवटीबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्रात घोडेबाजारास सुरुवात झाली नसली तरी त्या दिशेने पावले पडू लागली आहेत. राष्ट्रपती राजवटीची शिफारस हा त्यातलाच एक प्रकार. आम्ही नाही तर कुणीच नाही हा जो एक अहंकाराचा दर्प निकालानंतर दरवळू लागला आहे तो काही राज्याच्या हिताचा नाही. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या आदेशाचे पालन होत नाही व हा जनादेशाचा अपमान आहेवगैरे तत्त्ववादी विचार मांडणार्यांनी एक समजून घेतले पाहिजे की, हा जो काही जनादेश मिळाला आहे तो दोघांना मिळाला आहे. दोघांनी मिळून ज्या भूमिकांवर शिक्कामोर्तब केले त्यास हा जनादेश मिळाला आहे. मात्र ते मानायला तयार नव्हते म्हणूनच महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्हाला स्वतंत्र पावले उचलावी लागली. याचा दोष कोणी आम्हाला का द्यावा? भारतीय जनता पक्ष हा तत्त्वाचा, नीतिमत्तेचा, संस्काराने वागणारा पक्ष आहे असे म्हणतात, पण महाराष्ट्राच्या बाबतीत ही तत्त्वे आणि संस्कार त्यांनी पाळायलाच हवे होते. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात सत्ता स्थापन होऊ द्यायची नाही व राजभवनाच्या झाडाखाली बसून पत्ते पिसत बसायचे हा सर्व खेळ महाराष्ट्राची जनता पाहत असल्याची टीका यात करण्यात आली आहे.
या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, राज्यपाल हे सत्ताधारी पक्षाचेच असतात, पण किमानपक्षी त्यांनी स्वतंत्र वृत्तीने वागावे व घटनेतील उद्देशांचे पालन करण्याची आणि कायद्याची बांधिलकी पाळण्याची शपथ विसरू नये एवढी अपेक्षा असते. पण सध्याच्या राजकारणात सब घोडे बारा टके या न्यायाने साधनशूचितेच्या गप्पा मारणारेच सगळयात जास्त गोंधळ व भेसळ करीत आहेत. महाराष्ट्रात स्थिर राज्य यावे, ते लवकरात लवकर यावे, महाराष्ट्राच्या हिताचे व जनतेच्या कल्याणाचे काही घडावे ही अपेक्षा या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.