मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना-उबाठा गटाचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामातून आज पुन्हा भारतीय जनता पक्षाला लक्ष्य करत जोरदार टिका करण्यात आली आहे.
दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखात भाजपवर तिखट भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी हे दुतोंडी असल्यासारखे वागतात व बोलतात. आपल्या लोकांचा भ्रष्टाचार झाकून ठेवायचा व राजकीय विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करायचे हे त्यांचे धोरण आहे. अदानी यांच्या भ्रष्टाचारास व लुटमारीस थेट पंतप्रधान मोदी यांचेच पाठबळ आहे व या लुटीचे आकडे मोठे आहेत. कॉंग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे, अशा शब्दांत यात हल्लाबोल केलेला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, कॉंग्रेस किंवा अन्य राजकीय पक्ष ‘लूट की दुकान’ असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा. मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला असल्याची जोरदार टिका यात करण्यात आलेली आहे.