चंदीगढ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपचे अनेक बंडखोर नेते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. अशा स्थितीत भाजपने बंडखोरांवर कारवाई केली आहे. पक्षाविरोधात निवडणूक लढविणाऱ्या आठ कार्यकर्त्यांची भाजपने हकालपट्टी केली आहे. यामध्ये रणजित सिंह चौटाला यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रत्येकाची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
भाजपने हकालपट्टी केलेल्या नेत्यांमध्ये लाडवा येथील संदीप गर्ग, असंध येथील जिलेराम शर्मा, गन्नौर येथील देवेंद्र कादियान, सफिडॉनमधील बच्चन सिंग आर्य, रानिया येथील रणजीत चौटाला, मेहममधील राधा अहलावत, गुरुग्राममधील नवीन गोयल आणि हाथिनमधील केहर सिंग रावत यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या मंत्रिमंडळात ऊर्जामंत्री असलेले रणजित सिंह चौटाला यांना पक्षाने तिकीट नाकारले होते. यानंतर त्यांनी रानियामधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. भाजप आणि आरएसएसच्या सर्वेक्षण अहवालात रणजीत चौटाला यांचा रिपोर्ट चांगला नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचे तिकीट रद्द होऊ शकते, असे मानले जात होते.