
जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. या उपक्रमासाठी आज नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे झालेल्या नियोजन बैठकीत विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आली.

या बैठकीला आमदार सुरेश भोळे, जिल्हा महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे, उदय भालेराव, प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, नितीन इंगळे, जयेश भावसार यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन जयेश भावसार यांनी केले.
सेवा पंधरवड्यात आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपण, रक्तदान, प्रतिभावानांचा सन्मान, ‘वोकल फॉर लोकल’ चा प्रचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनकार्यावर आधारित फिल्म आणि पुस्तक वितरण, विविध स्पर्धा व कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे. हे कार्यक्रम समाजात जागरूकता निर्माण करणारे आणि राष्ट्रीय मूल्यांची जपणूक करणारे असतील, असे राजूमामा भोळे यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांची शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. हा सत्कार राजूमामा भोळे आणि दीपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
सेवा पंधरवडा कार्यक्रमासाठी समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संयोजक म्हणून विजय वानखेडे, सहसंयोजक ज्योती निंभोरे व सागर पाटील यांची निवड झाली आहे. प्रत्येक उपक्रमासाठी स्वतंत्र संयोजक नियुक्त करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्यात या कार्यक्रमांची अंमलबजावणी नियोजनबद्ध पद्धतीने केली जाणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी सामाजिक बांधिलकी जोपासत जनतेशी आपली नाळ अधिक बळकट करत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



