धरणगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील बस स्थानक समोरील रस्त्याचं बंद असलेलं काम त्वरीत सुरू करा’ अशी मागणी भाजपाने केली असून या संदर्भात सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न रास्तारोको करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते चोपडा रोडवरील गणेश ऑटो पर्यंतच्या कॉक्रीट रोडचे काम काही महिन्यापासून सुरू होते. परंतु गेल्या दिड महिन्यापासून प्रमुख रहदारीच्या रस्त्याचे हे काम मक्तेदाराने पूर्णपणे बंद केले आहे. अपूर्ण कामामुळे नागरिकांची फार मोठया प्रमाणात गैरसोय होत असून रहदारीस अडथळा निर्माण झालेला आहे. दररोज छोटे-मोठे अपघात घडत आहेत. पुढील काळात अपघात होऊन काही जीवित हानी होऊ नये यासाठी अभियंताच्या निगराणीत उत्तम दर्जाचे काम व्हावे यासह इतर मागण्यांचे निवेदन शहर भारतीय जनता पार्टीने दिले आहे.
यासह शहरातील सुभाषचंद्र बोस दरवाज्याचे खासदार निधीतून अंदाजपत्रक तयार करावे, जुन्या पुलावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यासाठी तालुक्यातील बांभोरी प्र.चा.ते निमखेडी येथील गिरणा नदीवर नवीन पूल बांधण्यात यावा, कोर्टाच्या नवीन इमारती समोर पाटचारीवर नवीन पूल बांधण्यात यावा मागण्यांचे निवेदन शहर भारतीय जनता पार्टीने दिले असून मागण्या मान्य न झाल्यास भारतीय जनता पार्टीतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अभियंता श्री.सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भाजपचे नेते शिरिषआप्पा बयास, ओबीसी जिल्हाध्यक्ष अॅड.संजय महाजन, अॅड.वसंतराव भोलाने, शहराध्यक्ष दिलीप महाजन, गटनेते कैलास माळी, नगरसेवक शरद कंखरे, ललित येवले, भालचंद्र जाधव, कन्हैया रायपूरकर, राजेंद्र महाजन, सचिन पाटील, विशाल पाटील आदी. पदाधिकारी उपस्थित होते.