चोपडा प्रतिनिधी । माजी आमदार कैलास पाटील यांनी आपल्या वाढदिवसाला जलसंधारण कृती समितीला २१ हजार रूपयांचा मदतनिधी प्रदान करण्यात आला.
चोपडा जलसंधारण कृती समिती मागील एक महिन्यापासून जलसंधारणाची विविध कामे करीत आहे. त्यात पाणी आडवा-पाणी जिरवा या उपक्रमांतर्गत वराड नाल्याचे खोलीकरण, शेततळे, रेन वाटर हार्वेस्टिंग, शोषखड्डे तयार करणे अशी विविध कामे हाती घेतली आहेत. या सर्व कामांना आतापर्यंत आयएएमए संघटनेमार्फत भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.
दरम्यान, सध्या सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचा भीषण टंचाईचा सामना सर्वाना करावा लागत आहे. पाणी अडविणे व जिरविणे गरजेचे आहे म्हणून तालुक्याचे माजी आमदार व चोपडा सहकारी सूतगिरणीचे चेअरमन कैलास गोरख पाटील यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करावयाचे ठरविले. या अनुषंगाने त्यांनी वाढदिवसाच्या निधी सामाजिक कामांसाठी द्यायचे ठरविले. यानुसार चोपडा तालुका जलसंधारण कृती समितीस एकवीस हजार रूपयांचा धनादेश प्रदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
याप्रसंगी जलसंधारण कृती समितीचे डॉ नरेंद्र शिरसाठ , डॉ निर्मल टाटिया, डॉ जगदीश सर्वैय्या, विश्वासराव बोरसे, सुधीर चौधरी, रामचंद्र भालेराव, सागर बडगुजर, आर. डी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कैलास पाटील यांचा जलसंधारण कृती समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.