नवी दिल्ली वृत्तसंस्था । दहशतवादाविरोधात अद्याप लढाई संपलेली नाही. ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील. जेव्हापर्यंत दहशतवादाच्या मुळाशी आपण पोहचत नाही, तोपर्यंत आपल्याला सोबत राहावे लागेल. दहशतवादाला संपवण्यासाठी आपल्याला अमेरिकेच्या मार्गावर चालावे लागेल. असे वक्तव्य भारताचे पहिले चीफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी केले आहे. नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
कट्टरतावाद आणि काश्मीरमध्ये पॅलेट गनचा वापर अशा गंभीर प्रश्नांवरही रावत यांनी भाष्य केलं. ‘दहशतवाद संपुष्टात आणणं अत्यंत गरजचे आहे. अमेरिकेने ९/११ हल्ल्यानंतर ज्यापद्धतीने आक्रमक भूमिका घेत जागतिक पातळीवर दहशतवादाविरोधात युद्ध पुकारले. त्याच पद्धतीने सर्व देशांनी दहशतवादाविरोधात लढायला हवे’, असे रावत म्हणाले. तसेच ‘दहशतवाद संपवण्यासाठी दहशतवाद्यांसोबतच अशा कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांनाही नेस्तनाभूत करण्याची गरज आहे’, असेही रावत म्हणाले. नवी दिल्ली येथे गुरुवारी आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.