निवडणूक आयोगाची पश्चिम बंगाल भाजपा नेत्यावर कारवाई

 

कोलकाता : वृत्तसंस्था । निवडणूक आयोगाने भाजपा नेते राहुल सिन्हा यांच्यावर कारवाई केली असून ४८ तासांसाठी प्रचारबंदी घालण्यात आली आहे. राहुल सिन्हा पुढील ४८ तास प्रचार करु शकणार नाहीत.

 

पश्चिम बंगालमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरु आहे. केंद्रीय निमलष्करी दलांबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्यं केल्याबद्दल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केल्यानंतर आता भाजपा नेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

 

भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी बिहारमधील सीतलकूची येथे चार नाही तर आठ लोकांना ठार करायला हवं होतं असं वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे. याशिवाय निवडणूक आयोगाने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांना नोटीस पाठवली आहे.

 

निवडणूक आयोगाने घातलेली प्रचारबंदी मंगळवारी संध्याकाळी सुरु होत असून १५ एप्रिलला दुपारी १२ वाजेपर्यंत कायम असेल. सीतलकूची येथील हिंसाचारात पाच लोकांनी आपला जीव गमावला होता. यामध्ये चार जणांना केंद्रीय दलाकडून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. राहुल सिन्हा यांनी यावर बोलताना चार नाही तर आठ जणांना गोळ्या घालायला हव्या होत्या असं म्हटलं होतं.

 

दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनाही निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली असून बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाला तर अशा घटना होत राहतील असं दिलीप घोष यांनी म्हटलं होतं.

 

केंद्रीय निमलष्करी दलांबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी आणि धार्मिक अभिनिवेश असलेली वक्तव्ये केल्याबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचारबंदी लागू केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी असल्याची टीका करत त्याविरुद्ध मंगळवारी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी जाहीर केला.

 

कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारची वक्तव्ये ममता बॅनर्जी यांनी केली असून, या वक्तव्यांचा आयोग निषेध करीत आहे. आचारसंहिता लागू असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे टाळावे, असे निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. निवडणूक आयोगाची बंदी सोमवार १२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून लागू झाली असून, ती मंगळवार १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत अमलात राहील.

Protected Content