पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा धरणगाव रस्त्यावर पुढे जात असलेल्या बैलगाडीला मागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तरूण गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात वृध्द शेतकरी व बैलांना दुखापत होवून बैलगाडीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रकांत विजय पाटील (वय- २४) रा.पिंप्री खुर्द ता.पारोळा असे मयत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा धरणगाव रस्त्यावरून राजवड येथील रहिवाशी सुभाष किशन पाटील (वय ६५) हे ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता बैलगाडीने घरी जात असतांना मागून चंद्रकांत पाटील हा दुचाकीने येत होते. त्यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी थेट बैलगाडीला मागणी आदळली. या अपघातात चंद्रकांत पाटील यांना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने धरणगाव येथील रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. तर शेतकरी सुभाष पाटील व दोन्ही बैल जखमी झाले आणि बैलगाडीचे नुकसान झाले. याप्रकरणी सुभाष पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बेदरकारपणे रस्त्यावर दुचाकी चालविल्याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पो.नि. सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण पाटील हे तपास करीत आहे.