मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोव्हे. 2005 नंतर नियुक्त सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आज सकाळी 10.15 वा. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, शिक्षक सेना, अखिल प्राथमिक शिक्षक संघ व इतर राज्य कर्मचारी संघटना यांच्या समन्वयाने प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय, मुक्ताईनगर बाईक रॅली काढण्यात आली.
सदर रॅलीत वरील सर्व संघटनांचे अध्यक्ष तथा संपूर्ण तालुका कार्यकारणी सदस्य तसेच सर्व NPS धारक कर्मचारी व इतर सर्व राज्य सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनी बहुसंख्येने उपस्थित होते. प्रवर्तन चौक ते तहसील कार्यालय दरम्यान बाईक रॅलीत एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशी कशी देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, या प्रकारच्या घोषणा देत सर्व सामान्यांचे किंबहूना त्यातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले गेले. बाईक रॅलीनंतर तहसील कार्यालय मुक्ताईनगर येथे मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना नायब तहसीलदार प्रदिप झांबरे यांच्या मार्फत जुनी पेन्शन मागणी बाबतचे निवेदन देण्यात आले.