जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन नागरी समस्यांसाठी आता महानगरपालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाहीत. नागरिकांना घरबसल्या आपल्या तक्रारी व समस्या नोंदविता याव्यात आणि त्यांचे जलदगतीने निराकरण व्हावे, यासाठी जळगाव शहर महानगरपालिकेकडून टोल-फ्री तक्रार निवारण सेवा सुरू करण्यात येत आहे. ही सेवा १३ जुलै २०२६ पासून नागरिकांसाठी उपलब्ध होणार असून १८०० २३३ ००१५ हा टोल-फ्री क्रमांक यासाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
महापौर सौ. दिपमाला मनोज काळे यांच्या पुढाकारातून सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या किरकोळ तक्रारी, नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, दिवाबत्ती तसेच इतर महानगरपालिका संबंधित समस्या थेट फोनद्वारे नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून कार्यालयांमध्ये प्रत्यक्ष जाण्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

महानगरपालिकेच्या माहितीनुसार, टोल-फ्री क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी संबंधित विभागांकडे तात्काळ वर्ग करण्यात येतील. संबंधित विभागांकडून त्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही करून त्यांचे शक्य तितक्या कमी कालावधीत निराकरण करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या व्यवस्थेमुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महापौर सौ. दिपमाला मनोज काळे यांनी जळगावकरांना आवाहन करताना सांगितले की, शहरातील नागरिकांनी १३ जुलै २०२६ पासून १८०० २३३ ००१५ या टोल-फ्री क्रमांकावर आपल्या तक्रारी आणि समस्या नोंदवून या सुविधेचा लाभ घ्यावा. नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने सोडविणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



